PRAJASHILP digital
धर्माबाद : शेतकऱ्यांसाठी शासनामार्फत अनुदानित दराने उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या युरिया खताची बेकायदेशीररीत्या परराज्यात वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कृषी विभागाच्या जिल्हा भरारी पथकाने धडक कारवाई करत टेम्पोसह ९ लाख ४०हजार ३१५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी धर्माबाद पोलीस ठाण्यात संबंधितांविरुद्ध विविध कायद्यांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा भरारी पथक प्रमुख तथा मोहीम अधिकारी सचिन कपाळे व जिल्हा भरारी पथक सचिव अमोल पेकम यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, शेतकऱ्यांसाठी राखीव असलेला अनुदानित युरिया खताचा मोठा साठा विनापरवाना व बेकायदेशीर मार्गाने तेलंगणा राज्याच्या दिशेने वाहतूक केला जात असल्याची माहिती प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारे जिल्हा भरारी पथकाने कृषी अधिकारी (गुण नियंत्रण), धर्माबाद यांच्या सहकार्याने सापळा रचून संशयित टेम्पो अडवून तपासणी केली.
तपासणीदरम्यान टेम्पोमध्ये कोणतेही वैध परवाने अथवा आवश्यक कागदपत्रांशिवाय शासकीय अनुदानित युरिया खताची पोती आढळून आली. त्यानंतर कृषी विभागाने तात्काळ कारवाई करत संपूर्ण खतसाठा व वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला टेम्पो जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या खतसाठा व वाहनाची एकूण किंमत ९ लाख ४० हजार ३१५ असून सदर मुद्देमाल पुढील कायदेशीर कारवाईसाठी धर्माबाद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
याप्रकरणी कृषी विभागाचे गुण नियंत्रण निरीक्षक विशाल चंदापुरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून धर्माबाद पोलीस ठाण्यात खत नियंत्रण आदेश, १९८५, अत्यावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ तसेच भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांच्या हक्काचे अनुदानित खत काळ्या बाजारात विक्रीसाठी परराज्यात पाठविण्याचा प्रयत्न कृषी विभागाने वेळेत हाणून पाडल्याने या कारवाईचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा पुढील तपास धर्माबाद पोलीस करीत आहेत.
सदर कारवाई जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, संचालक निवगुणी बोरकर, विभागीय कृषी सहसंचालक महेश तीर्थकर, मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी प्रवीण देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत तसेच कृषी विकास अधिकारी डॉ. नीलकुमार ऐतवडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
