PRAJASHILP digital
नांदेड :- संस्कृती मंत्रालय, भारत सरकार आणि स्वप्नरंग सांस्कृतिक संस्था, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २ ते ४ ऑगस्ट २०२६ या कालावधीत डॉ. शंकरराव चव्हाण सभागृह, नांदेड येथे स्वप्नरंग नाट्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. राज्यातील विविध शहरांतील नामांकित नाट्यसंस्था, लेखक, दिग्दर्शक आणि कलाकार यांच्या सहभागामुळे हा महोत्सव नाट्यरसिकांसाठी सांस्कृतिक पर्व ठरणार असून, तीन दिवसांत एकूण सात दर्जेदार नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहेत.
महोत्सवात मुंबई, पुणे, परभणी, लातूर आणि नांदेड येथील नाट्यसंस्था सहभागी होणार असून मराठी नाटक, दीर्घांक, एकांकिका आणि एकल नाट्यप्रयोग अशा विविध प्रकारच्या सादरीकरणांचा समावेश आहे. त्यामुळे नाट्यप्रेमींना वैविध्यपूर्ण आणि दर्जेदार नाट्यानुभव घेण्याची संधी मिळणार आहे.
रविवार, दिनांक २ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता माणूस फाऊंडेशन, मुंबई प्रस्तुत डॉ. सोमनाथ सोनवलकर लिखित व दिग्दर्शित अलेक्झांडर व्हाया डायोजेनिस हे मराठी नाटक सादर होऊन महोत्सवाचा शुभारंभ होईल.
सोमवार, दिनांक ३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता अभिव्यक्ती कट्टा, परभणी प्रस्तुत रविशंकर झिंगरे लिखित व अतुल साळवे दिग्दर्शित द्विगत हा दीर्घांक सादर केला जाईल. त्यानंतर रात्री ८.३० वाजता स्वप्नरंग सांस्कृतिक संस्था, नांदेड प्रस्तुत दिनेश कवडे लिखित व सुधांशू सामलेट्टी दिग्दर्शित लेबल ही एकांकिका आणि रात्री ९ वाजता दिनेश कवडे लिखित व दिग्दर्शित गर्भ ही एकांकिका रंगमंचावर सादर होईल. या दोन्ही नाट्यप्रयोगांतून समकालीन सामाजिक प्रश्नांवर प्रभावी भाष्य करण्यात येणार आहे.
मंगळवार, दिनांक ४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता व्यक्ती, पुणे प्रस्तुत धनंजय सरदेशपांडे लिखित व रुपाली गोडंबे दिग्दर्शित फारच टोचलंय हा एकल नाट्यप्रयोग सादर होईल. त्यानंतर रात्री ८.३० वाजता धनंजय सरदेशपांडे लिखित व सुयश झुंजुरके दिग्दर्शित खूपसा डायरी हा दीर्घांक रंगणार आहे. महोत्सवाची सांगता रात्री ९.३० वाजता नाट्यस्पंदन प्रतिष्ठान, लातूर प्रस्तुत दि. बा. मोकाशी लिखित, अतुल पेठे यांच्या नाट्यावृत्तीवर आधारित व श्रुतिकांत ठाकूर दिग्दर्शित आनंद ओवरी या एकपात्री प्रयोगाने होणार आहे.
या महोत्सवाच्या माध्यमातून राज्यातील विविध भागांतील नाट्यसंस्था, लेखक, दिग्दर्शक आणि कलाकार यांच्यात संवाद, अनुभवांची देवाणघेवाण आणि कलात्मक विचारांचे आदानप्रदान घडून येणार आहे. मराठी रंगभूमीची समृद्ध परंपरा अधिक बळकट करण्यास तसेच नाट्य व सांस्कृतिक चळवळीला नवी ऊर्जा देण्यासाठी हा महोत्सव महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
या तीन दिवसीय नाट्य महोत्सवासाठी स्थानिक जिल्हा प्रशासनाचे मोलाचे सहकार्य लाभले असून महोत्सव सर्वांसाठी पूर्णतः मोफत आहे. नांदेडसह संपूर्ण मराठवाड्यातील नाट्यप्रेमी, साहित्यप्रेमी, विद्यार्थी आणि सांस्कृतिक क्षेत्रातील रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कलावंतांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन स्वप्नरंग सांस्कृतिक संस्था, नांदेडचे अध्यक्ष तथा रंगकर्मी दिनेश कवडे यांनी केले आहे.
